मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू; अंतरवाली सराटीत रखरखत्या उन्हात आंदोलन

Spread the love

प्रतिनिधी : जुबेर शेख
अंतरवाली सराटी (जालना) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे मराठा आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचे हत्यार उपसले असून, जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे त्यांचे आंदोलन सुरू झाले आहे. विशेष म्हणजे देशातील अनोख्या आंदोलनांपैकी एक मानले जाणारे हे उपोषण कोणत्याही प्रकारच्या सावलीशिवाय, रखरखत्या उन्हात आणि शेतामध्ये सुरू करण्यात आले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी गावातील एका शेतामध्ये कोणतेही संरक्षण न घेता, उन्हापासून बचाव करणारी कोणतीही व्यवस्था न करता आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत शासनाकडून ठोस निर्णय व अंमलबजावणी व्हावी, यासाठी त्यांनी हा संघर्ष पुन्हा सुरू केल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, काल राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने अंतरवाली सराटी येथे भेट देऊन मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा केली होती. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरल्याचे समोर आले आहे. शासनाकडून मागण्यांबाबत समाधानकारक आश्वासन न मिळाल्याने उपोषणाचा निर्णय कायम ठेवण्यात आल्याची माहिती आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मराठा समाजाच्या मागण्यांची शंभर टक्के दखल घेतली जाईपर्यंत आणि त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही.” त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, त्यांनी राज्यातील मराठा बांधवांना एक महत्त्वाचे आवाहन देखील केले आहे. कोणत्याही परिस्थितीत मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीकडे येऊ नये, तसेच शांतता आणि संयम राखावा, असे आवाहन त्यांनी समाजबांधवांना केले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या या नव्या आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आगामी काळात हे उपोषण किती दिवस चालणार, शासनाची भूमिका काय राहणार आणि राज्यभरातून या आंदोलनाला कसा प्रतिसाद मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *