करोडो खर्चून उभं केलेलं मेडिकल कॉलेज; पण रुग्णांना सोलापूरला धाडायचं? — मनोज जाधव यांचा संतप्त सवाल

Spread the love


प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव:धाराशिव जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्यसेवेच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. “करोडो रुपये खर्च करून उभारलेल्या मेडिकल कॉलेजच्या इमारतीला काय चाटायचं का?” असा संतप्त सवाल रुग्णसेवक मनोज जाधव यांनी आरोग्य विभागाला केला आहे.

मनोज जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव तालुक्यातील कल्पना इंगळे यांना गर्भाशयाच्या पिशवीचा त्रास होत असल्याने उपचारासाठी धाराशिव वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांना पूर्वीपासून रक्तदाबाचा त्रास असल्याने ऑपरेशनपूर्वी कार्डिओलॉजिस्टची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. महाविद्यालयात कार्डिओलॉजिस्ट उपलब्ध नसल्याने त्यांना ऑपरेशनसाठी सोलापूर येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला.

या घटनेमुळे धाराशिव मेडिकल कॉलेजमधील आरोग्यसेवेबाबत पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले आहेत. “येथे फक्त प्राथमिक उपचार आणि मलमपट्टी करून रुग्णांना सोलापूरला पाठवले जाते,” अशी नाराजी जिल्ह्यातील नागरिकांमध्ये व्यक्त होत असल्याचे जाधव यांनी सांगितले. विविध गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना येथे उपचाराऐवजी बाहेर हलवण्याचा प्रकार सर्रास सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती आधीच बिकट असताना खासगी रुग्णालयांतील लाखो रुपयांचा खर्च परवडत नसल्याने सरकारी वैद्यकीय महाविद्यालय हाच एकमेव आधार असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र येथेच तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसतील तर करोडो रुपये खर्च करून उभारलेल्या इमारतीचा आणि डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या पगाराचा उपयोग नेमका कशासाठी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

यासोबतच वैद्यकीय महाविद्यालयातील एमआरआय आणि सीटी-स्कॅन मशीन अनेकदा बंद असतात, अशी तक्रारही त्यांनी केली. तसेच कॅथलॅबही बंद असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ऑर्थोपेडिक विभागातील अनेक रुग्णांना विविध कारणे सांगून खाजगी रुग्णालयात पाठवले जात असल्याचेही रुग्णांकडून ऐकायला मिळत असल्याचे जाधव यांनी सांगितले. त्यामुळे खाजगी रुग्णालयांशी काही लागेबांधे आहेत का, असा संशय नागरिकांच्या मनात निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आमदार कैलास पाटील यांनीही धाराशिव मेडिकल कॉलेजमधील एमआरआय मशीन आणि कॅथलॅब बंद का आहेत, असा प्रश्न उपस्थित करत सरकारला धारेवर धरले होते.

सोलापूरला उपचारासाठी हलवताना अनेक रुग्णांनी अर्ध्या वाटेतच प्राण गमावल्याची शेकडो उदाहरणे असल्याचा दावा करत जाधव यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. अन्यथा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *