धाराशिवमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाची (SIR) तयारी; ३३ BLO विरुद्ध कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Spread the love

प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव :केंद्रीय निवडणूक आयोग,नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार देशातील ९ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (Special Intensive Revision – SIR) सुरू करण्यात आला आहे. पुढील टप्प्यात महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याने त्यासाठी आवश्यक पूर्वतयारीच्या दृष्टीने धाराशिव जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्ष व प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ११ मार्च २०२६ रोजी पार पडली.

या बैठकीस विविध राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष व प्रतिनिधी, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तसेच नायब तहसीलदार (निवडणूक) उपस्थित होते. बैठकीदरम्यान उपस्थितांना मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच प्रत्येक मतदान केंद्रनिहाय Booth Level Agent (BLA) यांची नियुक्ती करून मतदार यादीची पडताळणी करण्यासाठी Booth Level Officer (BLO) यांच्याशी समन्वय साधण्याचे आवाहन करण्यात आले. SIR कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी SIR कार्यक्रमाच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यामध्ये सन २००२ मधील मतदार यादीतील मतदारांची सन २०२४ च्या मतदार याद्यांशी पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली. मात्र, धाराशिव जिल्ह्यातील एकूण ३३ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी अद्याप या कामकाजास सुरुवात केली नसल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर संबंधित ३३ BLO विरुद्ध नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना दिले आहेत.

तसेच धाराशिव जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत सन २०२४ मधील मतदारांची सन २००२ मधील मतदारांशी पडताळणी करताना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *