प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बहुचर्चेत असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवर अखेर शिक्कामोर्तब झाले असून अध्यक्षपदी भाजपच्या अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी उषाताई रविंद्र गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.उपाध्यक्ष पद हे शिवसेनेच्या वाट्याला गेले आहे. या निर्णयामुळे महायुतीतील सत्ता समीकरण स्पष्ट झाले असून जिल्हा परिषदेत भाजप-शिवसेना युतीचे वर्चस्व कायम राहिले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजप आणि शिवसेना यापैकी कोणत्या पक्षाला संधी मिळणार याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अखेर महायुतीतील समन्वयानंतर अध्यक्षपद भाजपकडे तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अर्चनाताई पाटील यांची अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली.
अध्यक्षपदाची घोषणा होताच जिल्हा परिषद परिसरात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करत तसेच एकमेकांना मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला. जिल्हाभरातून अर्चनाताई पाटील यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या निवडीमुळे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे जिल्ह्यातील राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने जिल्हा परिषदेत सत्ता टिकवून ठेवण्यात यश मिळवले आहे.
अर्चनाताई पाटील यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून त्यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्ह्याच्या विकासाला नवे गतीमान मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. ग्रामीण भागातील विकासकामांना प्राधान्य देत सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर काम केले जाईल, अशी अपेक्षा जिल्ह्यातील नागरिक व्यक्त करत आहेत.
