प्रतिनिधी : जुबेर शेख
मुंबई :महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांना शिवसेना पक्षाकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बच्चू कडू लवकरच शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ हाती घेणार आहेत. विशेष म्हणजे, ते प्रहार संघटना कायम ठेवत शिवसेनेसोबत राजकीय वाटचाल करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या निर्णयामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शेतकरी आणि दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांसाठी नेहमीच आक्रमक भूमिका घेणारे बच्चू कडू यांनी, यापुढेही त्यांच्यासाठीच ‘धनुष्यबाण’ वापरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाकडे सामाजिक आणि राजकीय स्तरावर विशेष लक्ष लागले आहे.
दरम्यान, विधान परिषदेच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असताना हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा राजकीय डावपेचात सर्वच पक्षांना धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
या घडामोडीनंतर येणाऱ्या काळात विधान परिषदेत बच्चू कडू यांचा आवाज अधिक ठळकपणे उमटणार, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेला ग्रामीण आणि सर्वसामान्य मतदारांमध्ये अधिक बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
