प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर जिल्ह्यात सुरू असलेल्या सत्तासमीकरणांच्या चर्चांना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाम शब्दांत पूर्णविराम दिला आहे. “प्रसंगी विरोधी बाकांवर बसावे लागले तरी चालेल; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही,” असा स्पष्ट इशारा देत त्यांनी पक्षएकजुटीला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे अधोरेखित केले.
नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी एकत्र लढवल्या होत्या. त्यामुळे पुढील सत्ता स्थापनेबाबत चर्चांना वेग आला आहे. मात्र, काही मंडळींकडून माध्यमांमध्ये दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवल्या जात असून, शिवसेनेतील एक गट वेगळा होत असल्याचा अपप्रचार केला जात असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला.
“स्वार्थी राजकारणातून काही जण शिवसेनेत मतभेद असल्याचा आभास निर्माण करत आहेत. आमदार तानाजी सावंत यांना वेगळे दाखवून पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, हा प्रयत्न कदापि यशस्वी होणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अखंड आणि सशक्त असल्याचा दावा करत, कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. “सत्ता महत्त्वाची असली तरी तत्त्वांशी तडजोड करणार नाही. दबाव, आमिष किंवा अफवांमुळे शिवसेनेची एकजूट ढळणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनिता पवार यांच्याशी चर्चा करून पुढील राजकीय रणनीती निश्चित केली जाईल, असेही सरनाईक यांनी सांगितले.
तसेच, पक्षाच्या अधिकृत भूमिकेशिवाय माध्यमांमध्ये भाष्य करणाऱ्या तथाकथित स्वयंभू नेत्यांना त्यांनी इशारा दिला. “पक्षाची भूमिका स्पष्ट होईपर्यंत कोणीही अनधिकृत विधान करू नये,” अशी सक्त ताकीद त्यांनी दिली.
धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिकांनी अफवांकडे दुर्लक्ष करून पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे आणि संघटन बळकट करण्यावर भर द्यावा, असे आवाहन करत सरनाईक यांनी आगामी राजकीय घडामोडींमध्ये शिवसेना अधिक सक्षमपणे उभी राहील, असा निर्धार व्यक्त केला.
