प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर:तुळजापूर तालुक्यातील मौजे तडवळा येथील तडवळा साठवण तलावातून सुरू असलेल्या पाणी उपसामुळे स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित कंपनीला रस्ते कामासाठी दररोज एक लाख लिटर पाणी उपसा करण्याची परवानगी देण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात यापेक्षा अधिक पाणी उपसा होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कळंब,ढोकी,तेर,बेंबळी,तुळजापूर ते अक्कलकोट रस्ता क्रमांक २०८ च्या कामासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग क्रमांक-०२, उमरगा यांच्या कार्यालयामार्फत कंपनीला तडवळा साठवण तलावातून पाणी उपसा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त पाणी उपसा होत असल्याने तलावावरील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.
तलावावर परिसरातील शेतकरी, जनावरे तसेच पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्याने भविष्यात गंभीर पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
यासंदर्भात मा. उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग क्रमांक-०६,तुळजापूर यांना निवेदन देऊन संबंधित कंपनीला देण्यात आलेली पाणी उपसा परवानगी तात्काळ रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पुढील आठ दिवसांत कोणतीही पूर्वकल्पना न देता तडवळा साठवण तलाव येथे ‘जलसमाधी’ आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनाची प्रत मा. प्रताप सरनाईक, पालकमंत्री धाराशिव, मा. जिल्हाधिकारी धाराशिव, मा. पोलीस निरीक्षक,पोलीस स्टेशन तुळजापूर तसेच मा. कार्यकारी अभियंता,पाटबंधारे विभाग क्रमांक-०२, उमरगा तसेच तहसिलदार तुळजापूर यांना माहितीस्तव पाठविण्यात आली आहे.
या निवेदनावर शिवसेना शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख गणेश नेपते,तुळजापूर तालुका उपप्रमुख विकास जाधव व शहाजी हाक्के,सचिन किल्लेदार,बाळू भैय्ये कदम,कल्याण सातपुते,उदय शामराज,नागनाथ कदम,कुलदिप लोंढे तसेच त्या तलावावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्याच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दरम्यान, या प्रकरणी संबंधित कंपनी व पाटबंधारे विभागाकडून अधिकृत भूमिका काय येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तलावावरील पाणीसाठा व ग्रामस्थांच्या गरजा लक्षात घेता प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून शाश्वत तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरत आहे.
