प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर:महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या श्री तुळजाभवानी देवींच्या मंदिरात गुढीपाडवा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याचे औचित्य साधून श्री तुळजाभवानी मंदिराच्या कळसावर पहाटे गुढी उभारण्यात आली. महंत तुकोजी बुवा व महंत वाकोजी बुवा यांच्या उपस्थितीत गुढी उभारून देवीला साखरेचा हार अर्पण करण्यात आला.
पहाटे देवींची चरणतीर्थ पूजा झाल्यानंतर मंदिराच्या शिखरावर गुढी उभारण्यात आली.
गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला सण असल्याने श्री तुळजाभवानी मंदिरात या दिवसाला विशेष महत्त्व आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सण धार्मिक उत्साह, भक्तीभाव आणि पारंपरिक रीतीरिवाजांनुसार साजरा करण्यात आला.
यावेळी सहायक व्यवस्थापक धार्मिक अनुप ढमाले, पुजारी बांधव व मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.
