मनसेच्या आक्रमक भूमिकेला यश; निवेदनानंतर तुळजापूरच्या वेतन नगरमधील स्मार्ट मीटर बसविण्याचे काम तात्पुरते थांबले

Spread the love

प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : तुळजापूर, उमरगा आणि लोहारा तालुक्यांमध्ये महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, यासंदर्भात महावितरण प्रशासनाला तीव्र निवेदन देण्यात आले. या निवेदनाची तात्काळ दखल घेत तुळजापूर शहरातील वेतन नगर परिसरात सुरू असलेले स्मार्ट मीटर बसविण्याचे काम तात्पुरते बंद करण्यात आल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

महावितरण कंपनी सर्वसामान्य नागरिकांवर स्मार्ट मीटरची सक्ती करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. आधीच महागाई, शेतीवरील कर्जाचा बोजा, बेरोजगारी आणि वाढत्या वीजदरामुळे नागरिक आर्थिक अडचणीत असताना स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जनतेवर अतिरिक्त आर्थिक भार टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

मनसेने स्मार्ट मीटरला विरोध करण्यामागील कारणेही स्पष्ट केली. इतर राज्यांमध्ये स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलांमध्ये ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाल्याच्या तक्रारी असल्याचा दावा करण्यात आला. तसेच रिचार्ज संपल्यास वीजपुरवठा खंडित होणे, तांत्रिक बिघाडाचा फटका ग्राहकांनाच बसणे, ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कचा अभाव आणि जनजागृती न करता सक्तीने मीटर बसविण्याचा निर्णय हा लोकशाहीविरोधी असल्याचे मनसेने म्हटले आहे.

मनसेने महावितरणकडे तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. तुळजापूर, उमरगा आणि लोहारा तालुक्यांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती तात्काळ रद्द करावी, केवळ स्वेच्छेने मागणी करणाऱ्या ग्राहकांनाच स्मार्ट मीटर उपलब्ध करून द्यावेत आणि जनतेला विश्वासात घेऊन संपूर्ण माहिती दिल्याशिवाय कोणत्याही घरात सक्तीने मीटर बसवू नयेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत तुळजापूर शहरातील वेतन नगर परिसरात सुरू असलेले स्मार्ट मीटर बसविण्याचे काम थांबविल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, संपूर्ण तालुक्यातील सक्ती पूर्णपणे थांबविण्यात यावी, अशी भूमिका मनसेने कायम ठेवली आहे.

दरम्यान, मनसेने इशारा देत म्हटले आहे की, नागरिकांच्या हिताच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल. पुढे उद्भवणाऱ्या कोणत्याही अनुचित परिस्थितीस महावितरण कंपनीच जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव, विधानसभा अध्यक्ष मयूर गाढवे, तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार, माजी तालुकाध्यक्ष धनाजी साठे, धर्मराज सावंत, विशाल माने, शशिकांत तांबे, अमोल मोठे, मनोज सोनवणे, समीर शेख, लहू सोनवणे, सोमेश्वर आलोरे, ओंकार मुळे, शिरीष डुकरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *