प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर:तुळजापूर तालुक्यातील मौजे काक्रंबा येथील मुस्कान रोऊफ शेख हिने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्र नवी मुंबई पोलीस दलात निवड मिळवून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. काक्रंबा गावातून पोलीस दलात निवड होणारी ती पहिलीच महिला ठरली असून तिच्या या यशामुळे संपूर्ण गावात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुस्कानच्या या यशाची बातमी गावात समजताच नागरिकांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. तिच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी होत असून, सर्व स्तरातून तिचे कौतुक केले जात आहे. तिच्या मेहनती, जिद्दी आणि चिकाटीमुळेच हे यश मिळाले असल्याचे गावकऱ्यांचे मत आहे.
साध्या कुटुंबातून पुढे येत मुस्कानने कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा याच्या जोरावर ही कामगिरी साध्य केली आहे. तिच्या यशामुळे गावातील इतर मुलींनाही प्रेरणा मिळत असून शिक्षण व स्पर्धा परीक्षांकडे वळण्याची सकारात्मक भावना निर्माण झाली आहे.
यावेळी बोलताना मुस्कान शेख हिने सांगितले की, “मला देशसेवा करण्याची संधी मिळाल्याचा खूप आनंद आहे. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. मी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे व निस्वार्थ भावनेने पार पाडणार आहे.”
मुस्कानच्या या उल्लेखनीय यशामुळे काक्रंबा गावाची मान उंचावली असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
