महिलांना ५०% आरक्षण द्या;तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील यांची आक्रमक भूमिका

Spread the love

प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत भाजप सरकारवर टीका केली आहे. महिलांना केवळ प्रतीकात्मक संधी न देता थेट ५० टक्के राजकीय आरक्षण देण्यात यावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली.

धैर्यशील पाटील म्हणाले की, महिलांना जागा वाढवून नव्हे तर विद्यमान रचनेतच ५० टक्के आरक्षण दिले पाहिजे. महिला या पुरुषांप्रमाणेच सक्षम आणि समान आहेत, त्यामुळे त्यांना समान प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या कार्याचा उल्लेख करत सांगितले की, १९९३ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के राजकीय आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला होता. विशेष म्हणजे, कोणत्याही अतिरिक्त जागा न वाढवता हे आरक्षण देण्यात आले होते. त्यामुळे महिलांच्या राजकीय सहभागाला मोठी चालना मिळाली.

भाजप सरकारनेही याच धर्तीवर निर्णय घेत, जागा न वाढवता महिलांना विधानसभेत व लोकसभेत पण ५० टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच महिला आरक्षणाचे खरे श्रेय शरद पवार यांनाच जाते, असे सांगत भाजपवर श्रेय लाटण्याचा आरोपही त्यांनी केला.

या प्रसंगी ज्येष्ठ सेलचे जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील, युवक तालुकाध्यक्ष शरद जगदाळे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्ष कटिबद्ध असून, येत्या काळात या मागणीसाठी अधिक तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *