प्रतिनिधी : जुबेर शेख
मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या खळबळ उडवणारी एक पोस्ट समोर आली असून, आ. रोहित पवार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. भोंदू खरात प्रकरण आणि त्यासंदर्भातील धागेदोरे मोठ्या नेत्यांपर्यंत पोहोचत असल्याच्या चर्चांवर त्यांनी थेट भाष्य केले आहे.
पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, काही ठिकाणी खरातला आत्महत्या किंवा अन्य कारण दाखवून संपवण्याचे प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताबाबत सखोल माहिती असलेल्या व्ही. के. सिंग यांना कोणत्याही परिस्थितीत वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचेही बोलले जात आहे.
या पार्श्वभूमीवर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडत म्हटले की, “दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. पण सत्य दडपण्यासाठी कोणाचा जीव घेतला जात असेल किंवा कोणाला दोषातून वाचवले जात असेल, तर या दोन्ही बाबी अजिबात योग्य नाहीत.”
राजकीय स्तरावर अशा प्रकारच्या रणनीती आखल्या जात असतील, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला. “अशा घटना घडल्यास महाराष्ट्राच्या जनतेचा व्यवस्थेवरील विश्वास उडू शकतो,” असेही त्यांनी नमूद केले.
तसेच, “सत्य लपवण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी ते कधीतरी बाहेर येतेच,” या शब्दांत त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करत अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.
दरम्यान, या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून, संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
