प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव : शिवसेना पक्षात महत्त्वाचा संघटनात्मक बदल करण्यात आला असून, धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुखपदावरून राजन साळवी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी माजी खासदार उन्मेष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राजन साळवी यांच्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. शिवसैनिकांना डावलणे, स्थानिक पातळीवर समन्वयाचा अभाव तसेच भाजपशी जवळीक वाढवल्याच्या आरोपांमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. या पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्वाने कठोर भूमिका घेत त्यांना पदावरून दूर केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, नव्याने नियुक्त करण्यात आलेले माजी खासदार उन्मेष पाटील यांचे शिवसैनिकांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील संघटन अधिक बळकट होईल, तसेच पक्षातील नाराजी दूर होऊन कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उन्मेष पाटील यांना संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव असून, त्यांनी यापूर्वीही विविध पदांवर प्रभावी कामगिरी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेचे बळ वाढेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
या बदलामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. पक्षात शिस्त आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचेही बोलले जात आहे.
एकूणच, या संघटनात्मक बदलामुळे धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना नव्या जोमाने उभी राहील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

