शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्याचा गोठा जळून खाक; लाखोंचे नुकसान, प्रशासनाकडून मदतीची मागणी

Spread the love

प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव : जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मौजे पाथर्डी येथे शेतकरी नागनाथ भगवान साखरे यांच्या शेतातील गोठ्याला अचानक लागलेल्या आगीमध्ये मोठे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या भीषण आगीत गोठा पूर्णतः जळून खाक झाला असून त्यामध्ये बांधण्यात आलेल्या गायी जागीच जळून मृत्यूमुखी पडल्या. तसेच गोठ्यातील म्हशी गंभीररीत्या भाजल्या गेल्या आहेत. याच आगीच्या झळा शेजारी उभ्या असलेल्या ट्रॅक्टरलाही बसल्या असून तोही पूर्णतः जळून खाक झाला आहे.

घटनेत गोठ्यामध्ये साठवून ठेवलेले गहू, ज्वारी, लसूण यांसारखी जीवनावश्यक धान्ये तसेच शेतीसाठी लागणारी अवजारेही आगीत नष्ट झाली आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही.

दरम्यान, धाराशिव जिल्ह्यात आधीच अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यावर दुहेरी संकट कोसळले आहे. या आगीत सुमारे ५ ते ६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामा करून संबंधित शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. अन्यथा या आर्थिक ताणामुळे शेतकऱ्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री व प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *