प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर तेथे अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित परत आणण्याची जबाबदारी पार पाडल्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील प्रवाशांच्या मदतीसाठी शिवसेना पुढे सरसावली आहे. इराण-इजराइल तणावाच्या पार्श्वभूमीवर विमानसेवा विस्कळीत झाल्याने Saudi Arabia येथे पर्यटनासाठी गेलेले काही महाराष्ट्रातील प्रवासी अडकले होते. या परिस्थितीत उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी तातडीने हस्तक्षेप करत दोन विशेष विमानांची व्यवस्था केल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.
विमानसेवा पूर्णपणे बंद असल्यामुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित कुटुंबीयांनी राज्य शासन व शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर परिस्थितीची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ प्रशासकीय यंत्रणा, परराष्ट्र विभागाशी समन्वय साधत विशेष विमानांची व्यवस्था केल्याचे सांगण्यात आले.
या दोन विमानांद्वारे अडकलेल्या सर्व प्रवाशांना सुखरूप महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून काही तासांत ते आपल्या घरी परततील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
यापूर्वी Jammu and Kashmir येथे दहशतवादी हल्ल्यानंतर अडकलेल्या पर्यटकांना प्रत्यक्ष भेट देत सुरक्षित परत आणण्याची भूमिका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बजावली होती. त्यानंतर आता परदेशात अडकलेल्या प्रवाशांसाठी घेतलेल्या पुढाकारामुळे पुन्हा एकदा त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक होत आहे.
महाराष्ट्रभरातून या निर्णयाचे स्वागत होत असून “संकटाच्या काळात शिवसेना नेहमीच जनतेच्या पाठीशी उभी राहते,” अशी प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानत, “सुख-दुःखाच्या प्रत्येक क्षणी शिवसेना मदतीला धावून जाते, हे पुन्हा सिद्ध झाले आहे,” असे सांगितले.
अडकलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला असून राज्य शासन व शिवसेनेप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. परदेशात उद्भवलेल्या आकस्मिक परिस्थितीतही राज्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने पावले उचलली गेल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
