तुळजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ACB चा सापळा; सहायक उपनिरीक्षक ५ हजारांची लाच स्वीकारताना जेरबंद

Spread the love


प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिव यांच्या पथकाने आज तुळजापूर येथे यशस्वी सापळा रचत सहायक पोलीस उपनिरीक्षकास ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई तुळजापूर पोलीस स्टेशन च्या आवारात पार पडली.

मूळ तक्रारदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने यापूर्वी १० हजार रुपये घेतले होते. तसेच गुन्ह्यात कलम वाढवू नये व मोटारसायकल जप्त करू नये यासाठी आणखी १५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती ५ हजार रुपयांवर व्यवहार निश्चित झाला. मात्र तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ACBकडे धाव घेतली.

दि. ४ मार्च रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली. पंचासमक्ष झालेल्या पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचून तक्रारदारास ५ हजार रुपये देण्यासाठी पाठविण्यात आले. संबंधित अधिकारी लाच स्वीकारताना ACBच्या पथकाने रंगेहात पकडले.

आरोपी श्रीनिवास रामदास आरदवाड (वय ४८), सहायक पोलीस उपनिरीक्षक, ब. नं. २१, महाराष्ट्र पोलीस (पोलीस स्टेशन तुळजापूर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

अंगझडतीदरम्यान ५,३०० रुपये, विवो कंपनीचा मोबाईल, पोलीस ओळखपत्र, चाव्यांचा गुच्छ, पेन, हातरूमाल, कंगवा व चष्मा जप्त करण्यात आला.

सदर प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय वगरे करीत असून पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक योगेश वेळापुरे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली असून मार्गदर्शन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर च्या पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे यांनी केले.

जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी झाल्यास तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन ACBकडून करण्यात आले आहे.
तक्रारीसाठी संपर्क:

टोल फ्री क्रमांक: १०६४

व्हॉट्सॲप: ९२७०२३१०६४

पोलीस अधीक्षक, ACB छत्रपती संभाजीनगर: ९०११०९२७७७

पोलीस उपअधीक्षक, ACB धाराशिव: ९०४९५१९८३३

ही कारवाईमुळे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराविरोधात ACBची कारवाई अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *