प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव :धाराशिव जिल्हा परिषदेत शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी संदेश उर्फ विकी चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या पुढाकाराने ही निवड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या निवडीमुळे जिल्हा परिषदेत शिवसेनेची भूमिका अधिक मजबूत होणार असल्याचे मानले जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद अध्यक्षपदावरही शिवसेना दावा करणार असून या संदर्भातील अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे घेणार आहेत. अध्यक्षपदाच्या निवडीवेळी आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे पारडे जड राहिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
गटनेते म्हणून संदेश उर्फ विकी चव्हाण हे सभागृहात शिवसेना पक्षाचा व्हीप जारी करणे तसेच पक्षाची ध्येय-धोरणे प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत. त्यांच्या निवडीच्या वेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, संपर्क प्रमुख राजन साळवी, माजी खासदार रवींद्र गायकवाड आणि माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यात शिवसेना एकसंध व एकजुटीने काम करणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आगामी अध्यक्षपदाच्या निवडीकडे आता जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
