तुळजापूरसाठी एसटी बस वाढवण्याची तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांची मागणी; परिवहन मंत्र्यांची तात्काळ दखल

Spread the love

प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील वाढती प्रवासी संख्या आणि भाविकांची गर्दी लक्षात घेता एसटी बससेवा मजबूत करण्याची मागणी पुढे आली आहे. शिवसेना तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री मा. ना. श्री. प्रतापजी सरनाईक यांना निवेदन देत तुळजापूर आगारासाठी नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

तुळजापूर हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री तुळजाभवानी मातेचे पवित्र स्थान असून, येथे राज्यभरातून दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. विशेषतः चैत्र पौर्णिमा, नवरात्रोत्सव आणि दर महिन्याच्या पौर्णिमेला येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या काळात सध्याची बससेवा अपुरी पडत असल्याने भाविकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

याशिवाय तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी शहरात ये-जा करतात. मात्र, बसेसची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर बस मिळत नाही. परिणामी त्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत असल्याची बाबही निवेदनात नमूद करण्यात आली आहे. विशेषतः सकाळी शाळा-कॉलेजसाठी येणाऱ्या आणि संध्याकाळी परत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त बसफेऱ्या सुरू करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

अमोल जाधव यांनी आपल्या निवेदनात तीन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत—तुळजापूर आगाराला नवीन बस ताफा उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागातून तुळजापूरकडे येणाऱ्या बस फेऱ्यांत वाढ करणे आणि भाविकांच्या गर्दीच्या काळात विशेष बससेवा सुरू करणे.

दरम्यान, परिवहन मंत्री मा. ना. श्री. प्रतापजी सरनाईक यांनी या निवेदनाची तात्काळ दखल घेत लवकरच तुळजापूरसाठी नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे.

तुळजापूरसारख्या धार्मिक आणि शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारणे आवश्यक असून, याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *