तुळजापूर यात्रा मैदानाचा विषय पुन्हा चर्चेत; येत्या अधिवेशनात विधानभवनात घुमणार?

Spread the love

प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर:तुळजापूर शहरातील बहुचर्चित आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला यात्रा मैदानाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमात बीड जिल्ह्याचे आमदार सुरेश धस उपस्थित होते. यावेळी शिवसेना तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी त्यांची भेट घेऊन तुळजापूर यात्रा मैदानासंदर्भात सविस्तर चर्चा केली.

मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला यात्रा मैदानाचा विषय मागील अधिवेशनातही आमदार सुरेश धस यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून विधानसभेत उपस्थित केला होता. त्यानंतरही या विषयावर कोणताही ठोस तोडगा निघालेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने झालेल्या भेटीत अमोल जाधव यांनी यात्रा मैदानाच्या प्रश्नाची सद्यस्थिती आणि स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा आमदार धस यांच्यासमोर मांडल्या. यावर प्रतिक्रिया देताना सुरेश धस यांनी संबंधित शिष्टमंडळासह बीड येथे भेट देण्याचे आवाहन केले. तसेच येणाऱ्या अधिवेशनात हा मुद्दा पुन्हा एकदा सरकारसमोर ठामपणे मांडण्यात येईल आणि यात्रा मैदानाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिल्याचे सांगण्यात आले.

तुळजापूर हे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असल्याने दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे शहराच्या नियोजनात यात्रा मैदानाला विशेष महत्त्व आहे. मात्र विविध कारणांमुळे हा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिल्याने स्थानिक नागरिक, व्यापारी आणि विविध संघटनांकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.

आता आमदार सुरेश धस यांनी हा प्रश्न पुन्हा अधिवेशनात उपस्थित करण्याचे आश्वासन दिल्याने तुळजापूरवासीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. येणाऱ्या अधिवेशनात यात्रा मैदानाचा विषय पुन्हा एकदा विधानभवनात गाजणार का? तसेच सरकार यावर नेमका कोणता तोडगा काढणार? याकडे संपूर्ण तुळजापूर शहराचे लक्ष लागले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *