प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव : जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस पालकमंत्री प्रताप सरनाईक, आमदार राणाजगजितसिंह पाटील, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदना महाडदलकर, पोलीस अधीक्षक ऋतु खोखर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला गती देण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या अंतर्गत मंदिराच्या विकास कामांचे भूमिपूजन मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.
राज्य शासनाने सुमारे १८६५ कोटी रुपयांच्या भव्य विकास आराखड्यास मंजुरी दिली असून त्यापैकी ४२१ कोटी रुपयांच्या विविध कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. अयोध्येतील राम मंदिर अयोध्याच्या धर्तीवर तुळजाभवानी मंदिर परिसराचा विकास भव्य आणि दिव्य स्वरूपात करण्याचे नियोजन आहे. यासाठी वेळेचे काटेकोर पालन करत सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
या विकास आराखड्यात रामदरा तलाव परिसरात शिवसृष्टी उद्यान उभारणे, मंदिर परिसरातील आठ जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार, आठ कुंडांचे पुनरुज्जीवन, पार्किंग प्लाझा उभारणी, प्रमुख रस्त्यांचे सुशोभीकरण, भक्तनिवास आणि दर्शन मंडप उभारणी यांसारख्या विविध कामांचा समावेश आहे.
महापुरुषांच्या पुतळ्यांसाठी समिती स्थापन होणार
बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांच्या पुतळ्यांबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. शासनाच्या निकषांचे पालन न करता अनधिकृत पुतळे उभारण्याच्या प्रकारांमुळे सामाजिक तणाव निर्माण होत असल्याचे निदर्शनास आल्याने, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच इच्छुकांना नियमानुसार मार्गदर्शन करण्यावर भर देण्यात येणार आहे.
याशिवाय बैठकीत मुख्यमंत्री शेतकरी सौर पंप योजना, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, जलसंपदा, मृद व जलसंधारण, नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना तसेच जलजीवन मिशन अंतर्गत पाणीटंचाई या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
एकूणच, तुळजाभवानी मंदिराच्या विकास आराखड्यामुळे धाराशिव जिल्ह्याच्या पर्यटन आणि धार्मिक महत्त्वात मोठी भर पडणार असून, येत्या काळात जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.
