प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव : शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अग्निवेश विलासराव शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, त्यामुळे धाराशिव शहर काँग्रेसमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पाठवलेल्या पत्राद्वारे त्यांनी हा राजीनामा सादर केला आहे.
२२ मे २०२६ रोजी दिलेल्या राजीनामा पत्रात अग्निवेश शिंदे यांनी काँग्रेस पक्षाने दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. शहराध्यक्ष म्हणून काम करताना पक्षाच्या ध्येयधोरणानुसार प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले आहेत.
राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे की, काम करताना काही उणिवा राहिल्या असतील तर त्याची पूर्ण जबाबदारी स्वतःची असून, नकळत कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमाही मागितली आहे.
सध्या वैयक्तिक अडचणींमुळे शहराध्यक्ष पदाला योग्य न्याय देता येत नसल्याचे कारण त्यांनी राजीनाम्यामध्ये स्पष्ट केले आहे. तसेच इतर कार्यकर्त्यांनाही या पदावर काम करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
अग्निवेश शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे धाराशिव शहर काँग्रेसमध्ये पुढील शहराध्यक्ष कोण होणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा काँग्रेससाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
दरम्यान, पक्षश्रेष्ठी हा राजीनामा स्वीकारणार की शिंदे यांची समजूत काढणार, याकडे आता काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

