प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव : शहरातील आनंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जागेच्या वादातून एका महिलेला मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रजियाबी मकबुल सय्यद (वय ५८, रा. शांतीनिकेतन कॉलनी, धाराशिव) यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून आरोपी अनिस अहमद सय्यद, वारीस इरशाद सय्यद, तौसीफ मुमशाद मशायक, फैजान मसरत मशायक आणि ईमान मोमीन (सर्व रा. मशायक गल्ली, खाजा नगर, धाराशिव) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, दि. १९ मे २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शांतीनिकेतन कॉलनी येथील सर्वे नं. १६४/४ मधील जागेच्या वादातून हा प्रकार घडला. संबंधित आरोपींनी एकत्र येत फिर्यादी महिलेस शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्यांनी मारहाण करून त्यांना जखमी करण्यात आले. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून, जागेच्या वादातून वाढणाऱ्या तणावाच्या घटनांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, आनंदनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीसांकडून सुरू आहे.
