प्रतिनिधी : जुबेर शेख
मुंबई : प्रहार जनशक्ती पक्षातून शिवसेनेत प्रवेश करून नुकतीच विधानपरिषदेच्या सदस्यपदाची उमेदवारी मिळालेल्या आमदार बच्चू कडू यांच्यावर शिवसेना पक्षाने आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार बच्चू कडू यांची शिवसेनेच्या विदर्भ विभागीय नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीचे अधिकृत पत्र शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर पोस्ट केले. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात या नियुक्तीची मोठी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे विधानपरिषदेच्या सदस्यपदाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लगेचच बच्चू कडू यांच्यावर विदर्भासारख्या महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी सोपवण्यात आल्याने शिवसेनेने त्यांच्यावर मोठा विश्वास दाखविल्याचे मानले जात आहे.
बच्चू कडू हे विदर्भातील प्रभावी आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जातात. शेतकरी, दिव्यांग, बेरोजगार आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आंदोलन करणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीमुळे शिवसेनेला विदर्भात मोठे बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
गेल्या काही वर्षांत विदर्भात शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत बच्चू कडू यांच्यासारखा जनाधार असलेला नेता पक्षात सक्रिय झाल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तसेच विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, बच्चू कडू यांच्या नियुक्तीनंतर त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी स्वागत व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विधानपरिषदेच्या सदस्यपदाची उमेदवारी आणि त्यानंतर विदर्भ विभागीय नेतेपदाची जबाबदारी मिळाल्याने येणाऱ्या काळात शिवसेना पक्षाची विदर्भातील ताकद आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

