उस्मानाबाद-बीड-लातूर विधान परिषद जागेवर शिवसेनेचा दावा; ज्ञानराज चौगुले इच्छुक?,महायुतीत रस्सीखेच वाढण्याची शक्यता

Spread the love

प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून होणाऱ्या विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महायुतीतील घटक पक्षांमध्येही काही जागांवरून चुरस वाढताना दिसत असून उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद जागा सध्या विशेष चर्चेत आली आहे.

२०१८ मध्ये या जागेवर भाजपच्या तिकिटावर सुरेश धस विजयी झाले होते. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा एकदा या जागेवर भाजप दावा करणार असल्याचे मानले जात असतानाच आता शिवसेना पक्षानेही या जागेवर आपला दावा मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महायुतीत उमेदवारीवरून तणाव निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तसेच शिवसेना पक्षाचे उपनेते ज्ञानराज चौगुले यांचे नाव या जागेसाठी चर्चेत आले आहे. पक्षांतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार धाराशिव – बीड तसेच लातूर येथील पदाधिकारी व शिवसैनिक लवकरच एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विधान परिषद उमेदवारीची मागणी करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

उस्मानाबाद, बीड आणि लातूर या तीन जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचे मोठे संख्याबळ असले तरी उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपकडून पुन्हा दावा कायम ठेवला जाण्याची शक्यता असताना शिवसेनेनेही आक्रमक भूमिका घेतल्याने ही निवडणूक अधिक रंगतदार होणार असल्याचे राजकीय निरीक्षक सांगत आहेत.

विशेष म्हणजे, आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचाही राजकीय समीकरणांवर परिणाम होणार असल्याने प्रत्येक पक्ष आपले अस्तित्व मजबूत करण्याच्या तयारीत आहे. त्यातच विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक नेत्यांकडून पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी वाढल्या आहेत.

२५ मेपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असून अंतिम क्षणी महायुतीत जागावाटपावर काय निर्णय होतो, तसेच उस्मानाबाद-बीड-लातूर विधान परिषद जागा नेमकी कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाते याकडे आता संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *