धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर महायुतीचे वर्चस्व;शिवसेना शिंदे गटाचा सर्वाधिक स्ट्राईक रेट,सेनेचा सत्तेतील दावा भक्कम

Spread the love


धाराशिव:धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होताच जिल्हा परिषदेत महायुतीचे स्पष्ट वर्चस्व निर्माण झाले असून, शिवसेना (शिंदे गट), भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी मिळून सत्तेचा किल्ला मजबूत केला आहे. काही मतदारसंघांत शिवसेना व भाजप आमनेसामने असले तरी बहुतांश ठिकाणी महायुतीचे नियोजन यशस्वी ठरले.

भुम, परंडा आणि वाशी मतदारसंघांत शिवसेना व भाजप यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली. मात्र इतर ठिकाणी महायुतीमुळे मतांचे विभाजन टळले आणि त्याचा फायदा थेट निकालात दिसून आला.

शिवसेना शिंदे गटाने एकूण २३ जागांवर उमेदवार उभे केले, त्यापैकी १५ जागांवर विजय मिळवत तब्बल ६५ टक्के स्ट्राईक रेट साधला आहे. हा स्ट्राईक रेट सर्व पक्षांमध्ये सर्वाधिक ठरला असून, शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीचे ते प्रतीक मानले जात आहे.

त्याखालोखाल भाजपने ४१ जागांपैकी १९ जागा जिंकत ४६ टक्के यश, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने १६ पैकी ६ जागा जिंकत ३७.५ टक्के यश मिळवले आहे.

काँग्रेसने १६ पैकी केवळ ३ जागा जिंकत १८.७५ टक्के यश मिळवले. शिवसेना उबाठा गटाने सर्वाधिक म्हणजे ४४ जागांवर उमेदवार उभे केले, मात्र त्यांना फक्त ७ जागांवर विजय मिळवता आला. त्यामुळे त्यांचा यशाचा टक्का १५.९० टक्के इतकाच राहिला.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने १२ जागांवर उमेदवार दिले, मात्र एकाही जागेवर विजय मिळवता न आल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.

शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या सभेनंतर जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, संपर्कप्रमुख राजन साळवी, माजी खासदार रवींद्र गायकवाड आणि माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उमरगा, लोहारा, कळंब व धाराशिव तालुक्यांत प्रभावी नियोजन करत विजय सुनिश्चित केला.

भुम–परंडा–वाशी मतदारसंघात आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी एकाकी खिंड लढवत विक्रमी विजय मिळवला. या भागात शिवसेनेच्या तुल्यबळ जागा निवडून आल्याने तेही या विजयाचे प्रमुख शिल्पकार ठरले आहेत.

जिल्हा परिषद संख्याबळ;५५ जागांच्या जिल्हा परिषदेत

भाजप – १९ जागा (सर्वात मोठा पक्ष)

शिवसेना (शिंदे गट) – १५ जागा

राष्ट्रवादी (अजित पवार गट) – ६ जागा

शिवसेना (उबाठा) – ७ जागा

काँग्रेस – ३ जागा

अपक्ष – ४ जागा

समाजवादी पार्टी – १ जागा

महायुतीकडे एकूण ४० जागा असल्याने स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे. महाविकास आघाडीकडे १० जागा असून उर्वरित अपक्ष व समाजवादी पार्टीकडे आहेत.

भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला १५ जागा मिळाल्याने अध्यक्षपदावर सेनेचा ठोस दावा मानला जात आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती अशा ६ महत्त्वाच्या पदांवर शिवसेना दावा करू शकते. काही अपक्ष निवडून आलेले उमेदवार हे शिवसेनेशी जवळचे असल्याने सेनेची बार्गेनिंग पॉवर आणखी वाढली आहे.

शिवसेना आता गेम चेंजर आणि निर्णायक भूमिकेत आल्याने जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. आगामी सत्तावाटपात शिवसेनेच्या पदरात नेमके काय पडते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *