प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : सोलापूर येथील नूतन उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सहकुटुंब तुळजापूर येथे येऊन श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. उपमहापौर पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर त्यांनी मातेच्या चरणी नतमस्तक होत शहराच्या प्रगतीसाठी आशीर्वाद मागितले.
तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असल्याने दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. त्याच पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वरी देवकर यांनी आपल्या कुटुंबियांसह मंदिरात उपस्थित राहून विधिवत पूजा-अर्चा केली.
यावेळी त्यांच्या स्वागताचा व सत्काराचा कार्यक्रमही पार पडला. त्यांना आईची कवडीची माळ, नारळ व श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले. या सत्कार सोहळ्याला स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमावेळी शिवसेना पक्षाचे तुळजापूर उपशहर प्रमुख रमेश चिवचिवे, सिध्दूं लोंढे, आनंद चिवचिवे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी उपमहापौर देवकर यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या या धार्मिक भेटीमुळे तुळजापूर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भाविकांमध्येही आनंद व्यक्त केला जात आहे.
