प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : तिर्थक्षेत्र म्हणून संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असलेल्या तुळजापूर शहरात अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. धाराशिव रोड ते महाद्वार रोड या मुख्य मार्गावर व्यापारी व इतर व्यवसायिकांकडून मोठ्या प्रमाणात अनधिकृत अतिक्रमण करण्यात आले असून, त्यामुळे श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
तुळजापूर हे श्री तुळजाभवानी मातेचे प्रमुख तीर्थक्षेत्र असल्याने दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. मात्र, मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच अतिक्रमण वाढल्यामुळे भाविकांची ये-जा अडथळ्यांची ठरत आहे. अनेक ठिकाणी दुकाने रस्त्यावरच वाढवून ठेवण्यात आली असून, काही ठिकाणी वाहनतळ व फेरीवाल्यांमुळे रस्ता अधिकच अरुंद झाला आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाकडे निवेदन देत तातडीने अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे. व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय मर्यादेत ठेवावा, अन्यथा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
तसेच, अतिक्रमण हटविण्याची मोहीम ही नियमितपणे, दर चार दिवसांनी राबविण्यात यावी, जेणेकरून पुन्हा अतिक्रमण होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः महाद्वार परिसरातील अतिक्रमण तातडीने हटविण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या वाढत्या अतिक्रमणामुळे तुळजापूरच्या धार्मिक महत्त्वाला धक्का बसत असून, भाविकांच्या सोयीसुविधांवरही परिणाम होत आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने त्वरित पावले उचलून हा प्रश्न सोडवावा, अशी सर्वसामान्य नागरिक व भाविकांची मागणी आहे.
यावेळी रमेश काका कदम,किरण कदम,विक्रम कदम,मल्हार बर्वे,नानासाहेब पेंदे,विशाल कदम,किरण परदेशी,ओंकार भिसे,हरी साळुंके,सरफराज शेख,किरण लोंढे तसेच अनेक पुजारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
