प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : शहरातील कमान वेस परिसरात बसविण्यात आलेल्या हायमास्ट लाईटच्या पोलवरील दिवे वारंवार बंद पडत असून सध्या पूर्णतः बंद अवस्थेत असल्याने भाविक भक्तांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
तुळजापूर हे राज्यासह देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून येथे श्री तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येत असतात. विशेषतः रात्री उशिरा आणि पहाटेच्या सुमारासही भाविकांचे आगमन सुरूच असते. अनेक भाविक पुजारी वर्गाकडे मुक्काम करून धार्मिक विधी पूर्ण करतात.
भाविकांची ही गरज लक्षात घेऊन नगर परिषदेकडून शहरातील विविध ठिकाणी हायमास्ट लाईट बसविण्यात आले आहेत. मात्र कमान वेस परिसरात, जिथे भाविकांची सर्वाधिक वर्दळ असते आणि मोठ्या प्रमाणात पुजारी वर्ग वास्तव्यास आहे, तेथील लाईट सतत बंद पडत असल्याची तक्रार आहे. दुरुस्ती करूनही लाईट कार्यान्वित होत नसल्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
यामुळे रात्रीच्या वेळी भाविकांना मार्गक्रमण करताना अडचणी येत असून सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होत आहे. स्थानिक नागरिक आणि पुजारी वर्गाने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात नगर परिषद प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले असून, कमान वेस येथील हायमास्ट लाईट तात्काळ दुरुस्त करून किंवा आवश्यक असल्यास नवीन लाईट बसवून भाविकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी रमेश काका कदम,किरण कदम,विक्रम कदम,मल्हार बर्वे,नानासाहेब पेंदे,विशाल कदम,किरण परदेशी,ओंकार भिसे,हरी साळुंके,सरफराज शेख,किरण लोंढे तसेच अनेक पुजारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
